शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सगळीकडे देवीची पूजा, आरती, गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली गेली आहे. नऊ वेगवेगळ्या रुपात अवतार घेऊन नवदुर्गेने महिषासुराचा वध केला होता. दुर्गेच्या या नऊ अवतारांची गाथा आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तर देवीला अनेक नावांनी ओळखले जाते महिषासुरमर्धिनी, दहिषासुरमर्धिनी, करवीरपुरवासिनी तसेच दुर्गा अशा अनेक नावात देवी दुर्गेची व्याप्ती आहे. चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवसाची प्रमुख देवी कालरात्री आहे. जाणून घेऊयात देवी कालरात्री कोण होती.
कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधार्या रात्रीप्रमाणे काळा, डोक्यावरील केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळ आहे. म्हणून या देवीला कालरात्री म्हणतात. या देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. या चतुर्भुज देवीचे वाहन गाढव आहे. उजव्या एका हाताची अभय व दुसर्याची वरमुद्रा आहे. एका डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसर्या हातात तलवार आहे. उग्र स्वरूप असूनही शुभ फळ देणार्या या देवीला शुभंकरी म्हणतात. ज्या लोकांना अज्ञात भीती, मानसिक तणाव राहतो, अशा लोकांनी कालरात्रीची पूजा करावी. तिची उपासना केल्याने भक्ताचे सर्व दु:ख आणि अडथळे दूर होतात.
कालरात्रि देवीला कालीमातेचे स्वरुपही मानले जाते. पार्वती देवीपासून कालीमातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. तिन्हीसांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे विधान आहे. गंगाजल, पंचामृत, पुष्प, गंध, अक्षता यांनी देवीचे पूजन करावे. तसेच देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते.